भिगवण: उजनी जलाशयात मच्छीमारी करणाऱ्या राहुल काळे यांच्या जाळ्यात कटला जातीचा मासा सापडला असून, त्याचे वजन तब्बल २९ किलो आहे. त्याला मंगळवारी भिगवण मासळी बाजारात प्रतिकिलो १८० रुपये प्रमाणे पाच हजार दोनशे वीस रुपये असा उच्चांकी दर मिळाल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
राहुल काळे या मच्छीमाराला उजनी पाणलोट क्षेत्रात सापडलेला हा भला मोठा मासा येथील अंबिका फिश मार्केटवर विक्रीसाठी आणला होता. हा मासा शहजादा तांबोळी यांनी खरेदी केला. बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीने उजनी जलाशयात मासेमारी होत आल्याने अनेक प्रजातींचे मासे दुर्मीळ झाले आहेत, तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तरीही प्रमुख कार्प जातीचे मासे अधूनमधून सापडतात. सध्या उजनीच्या पाण्यात थोड्याप्रमाणात वाढ होऊ लागल्याने खोल पाण्यातील मासे प्रवाहाच्या दिशेने बाहेर पडू लागले आहेत. यातूनच या आठवड्यात काही मच्छिमारांना रोहू जातीचे आठ ते दहा किलो वजनाचे मासे सापडले आहेत