पुणे : पुण्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता वाघोली परिसरात नामांकित कंपनीच्या गोदामातील कामगारांनी १ कोटी ९ लाख रुपयांचे २८० लॅपटॉप चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार वाघोलीतील उबाळेनगर परिसरात आर्कलाईन लॉजिस्टीक्स अॅण्ड वेअरहाऊस प्रा. लि. कंपनीत घडला आहे.
याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश कुमार (रा. उबाळेनगर, वाघोली, नगर रस्ता) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत बाळकृष्ण सखाराम राऊत (वय ३८, रा. केसनंद, हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्कलाईन लॉजिस्टीक्स अँड वेअरहाऊस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वाघोलीतील उबाळेनगर परिसरात आहे. या कंपनीच्या गोदामात विविध कंपन्यांची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने ठेवली जातात. गोदामातून शहरातील विविध दुकानात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे विकण्यासाठी पाठविले जातात. बाळकृष्ण राऊत हे या कंपनीत व्यवस्थापक आहेत. गोदामात आरोपी सुरेश कुमार गेल्या दोन महिन्यांपासून काम करत होता.
सोमवारी सकाळी गोदामातून २८० लॅपटॉप चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड यांनी घटनास्थळी भेट दिली असून आरोपी सुरेशकुमार याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.