पिंपरी : खोटी माहिती सांगून, गोड बोलून फसवणूक करण्याचे प्रकार शहरात वाढत आहेत. वाकड परिसरात एका संगणक अभियंत्याला तब्बल २६ लाखांचा गंडा घालण्यात आला. तुम्ही पाठवलेल्या कुरियरमधून मुदत संपलेला पासपोर्ट, ड्रग्ज असल्याचे सांगत तसेच आधार नंबर बेकायदेशीर कृत्यासाठी वापरला जात असल्याची भीती दाखवून ही फसवणूक करण्यात आली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, याप्रकरणी उदय प्रताप शंकर दयाल सिंह (वय ३१, रा. प्रिस्टीन प्रोलाईफ, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, मोबाइल क्रमांकधारक राहुल देव, प्रदीप सावंत, पंजाब नॅशनल बँक आणि फेडरल बँकेचा खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेंबर रोजी फिर्यादीच्या मोबाइल क्रमांकावर आरोपी राहुल याने फोन केला. फेडएक्स कुरिअरमधून बोलत असल्याची माहिती त्याने दिली. फिर्यादी यांच्या नावाने मुंबई ते तैवान असे एक कुरिअर जात असल्याचे सांगून त्यामध्ये पाच भारतीय व पाच तैवानचे मुदत संपलेले पासपोर्ट तसेच पाच किलोग्रॅम कापड, सहा क्रेडिट कार्ड व ९५० ग्रॅम एमडी असल्याची खोटी माहिती दिली.
दरम्यान, फिर्यादीला ऑनलाइन सायबर तक्रार देण्यास सांगून, फिर्यादीचा फोन आरोपी प्रदीप याच्याकडे वळविला. त्यानंतर प्रदीपने फिर्यादीला फोन करुन फिर्यादी यांच्या आधार नंबरचा वापर हा बेकायदेशीर कृत्यासाठी होत असल्याचे सांगितले. फिर्यादीच्या बँक खात्यातून मनी लॉड्रिंग होत असल्याचे भासवले. फिर्यादीला घाबरवून आरोपींच्या पंजाब नॅशनल बँक तसेच फेडरल बँकेच्या खात्यांवर पैसे पाठविण्यास भाग पाडून फिर्यादी यांची २६ लाख ६ हजार रूपयांची ऑनलाइन फसवणूक केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.