पुणे: तलाठी भरती प्रक्रियेतील आदिवासी (पैसा) क्षेत्र आणि माजी सैनिक समांतर आरक्षण प्रवर्गातील पदे वगळता २५५ रिक्त पदांवर नियुक्ती करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करून अंतिम आदेशानुसार विभागनिहाय नियुक्तीपत्र देण्यास सुरुवात झाली आहे.
पेसा कायद्यांतर्गत असलेल्या पदांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यावर अद्याप निकाल आलेला नाही. त्यामुळे पेसा आणि माजी सैनिक समांतर आरक्षण प्रवर्गातील पदे वगळता इतर पदे नियमानुसार भरण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रियेतील उर्वरित पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यास सुरुवात झाली आहे.
गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी पात्र आहेत किंवा कसे, याबाबत संबंधित विभागांना पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करून चारित्र्य पडताळणी करून उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येत आहे. ज्या उमेदवारांची संबंधित विभागांकडून माहिती प्राप्त झाली नाही किंवा कागदपत्रांत त्रुटी असेल, त्या उमेदवारांपुढील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
दरम्यान, जिल्ह्यातील पेसांतर्गत क्षेत्र वगळता आणि बिगर पेसा क्षेत्रातील आणि माजी सैनिक प्रवर्गातील पदे वगळता इतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या कार्यासन अधिकारी शीतल माने यांनी तलाठी भरती परीक्षेतील गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.