पुणे : पुणे आणि नाशिक ही दोन महत्वाची शहरे अजूनही रेल्वेने एकमेकांना जोडली गेली नाहीयेत. रेल्वेने ही शहरे जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यासाठी निधीची कमतरता हा मोठा अडचणीचा मुद्दा होता. आता ती अडचम दूर झाली आहे. नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी 2500 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. यामुळे नाशिक–पुणे रेल्वे मार्ग उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. महारेलकडून या मार्गावर सेमीहायस्पीड ट्रेनचे काम सुरु केले आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मध्य रेल्वे बोर्डाकडे दिला गेला होता. परंतु त्यात काही त्रुटी होत्या. त्या त्रुटींचे निवारण करण्यात आले. त्यानंतर पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा अंतिम आराखडा तयार झाला. आता या मार्गासाठी निधीची सर्वात मोठी अडचण होती. नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी 2500 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. रेल्वे मंडळाकडून निधीला मान्यता मिळाली आहे. 60 टक्के इक्विटीतून हा निधी मिळणार आहे.
कसा आहे हा प्रकल्प
नाशिक-पुणे रेल्वे मार्ग 235 किलोमीटरचा आहे. या मार्गावर 19 उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच 18 बोगदे असणार आहे. मार्गावर एकूण 20 स्टेशन असणार आहे. हा मार्ग सुरुवातीपासून संपूर्ण विद्युतीकरण झालेला आहे. 200 किलोमीटर प्रतितास वेगाने सेमीहायस्पीड रेल्वे या मार्गावरुन धावणार आहे. या मार्गावरुन पहिल्या टप्प्यात 6 कोचची रेल्वे धावणार आहे. त्यानंतर 12 ते 16 कोचची रेल्वे धावणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर पुणे-नाशिक पाच ते सहा तासांचा प्रवास अवघ्या 1 तास 45 मिनिटांत पूर्ण होणार आहे.