रोहोकडी (जुन्नर): जुन्नर तालुक्यातील ओतूर, डोमेवाडी येथे सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आकाशातून मोठ्या आकाराचा बर्फाचा गोळा येथील शेतकरी बाबाजी वाजगे यांच्या सोयाबीनच्या शेतात पडला. या बर्फाच्या तुकड्याची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नमुने पाठवण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, डोमेवाडी येथील जुना डोमेवाडी रोडलगत बाबाजी वाजगे यांची गट नं. ३२५ मध्ये जमीन आहे. त्या शेजारीच काही शेतमजूर काम करत होते. त्यावेळेस त्यांना हवेतून काहीतरी आल्याचा आवाज आला. तेव्हा त्यांनी आकाशाकडे पाहिले असता त्यांना दक्षिण दिशेकडून पांढऱ्या रंगाचा गोळा जमिनीच्या दिशेने येत असल्याचे दिसले. परंतु काही मजुरांचा व शेतातील शेतकऱ्यांचा समज झाला की, विमान चालले असावे.
परंतु, काही क्षणातच हा गोळा अत्यंत वेगात येऊन वाजगे यांच्या शेत जमिनीवर आदळला. गोळा जमिनीवर पडताच मोठा आवाज झाला. त्यामुळे तेथील जमावाने जवळ जाऊन पाहिले असता, बर्फाचा मोठा गोळा जमिनीवर पडलेला होता. गोळा जमिनीवर पडल्याने बर्फाचे तुकडे झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ओतूरचे मंडलाधिकारी विजय फलके, तलाठी अतुल विभूते, कर्मचारी संदीप राऊत यांनी या ठिकाणी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जाऊन पाहणी केली. यावेळी तो बर्फाचा गोळा वितळला होता.
यावेळी तान्हाजी तांबे, बबन भोरे, झांबर जाधव, राजू भोर, जयसिंग तांबे, नितीन डुंबरे, बाबाजी डुंबरे, पंकज डुंबरे, तुकाराम डुंबरे, बाबुराव डुंबरे, रामदास भोरे, बाळू भोरे, संतोष नलावडे, प्रवीण डुंबरे आदी शेतकरी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान जुन्नरचे तहसीलदार डॉ. सुनील शेळके म्हणाले की, आकाशातून जमिनीवर पडलेल्या बर्फाच्या गोळ्याचा तुकडा तपासणीसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. तपासणीनंतर नक्की काय ते समोर येईल.