लोणी काळभोर : होळकरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गट नं ७७ व ८३ या गायरान क्षेत्राला वणवा लागल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. १८) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या अपघातात १५ ते १६ हजार विविध प्रजातीची झाडे नष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे.
याप्रकरणी तानाजी मिठ्ठल जाधव (वय ५६, धंदा- नोकरी, रा. जनार्दन नगर, वडगाव शिंदे रोड, गल्ली नं ३, लोहगाव) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी जाधव यांच्याकडील हंगामी वन मजूर अंकुश थिटे यांनी होळकरवाडी गायरान क्षेत्रामध्ये वणवा लागल्याची माहिती दूरध्वनीवरुन दिली होती. या घटनेची माहिती मिळताच जाधव यांनी या घटनेची माहिती तत्काळ लोणी काळभोर पोलिसांना दिली. स्थानिक लोकांच्या मदतीने पेटलेला वणवा विझविण्यास सांगितले.
तानाजी जाधव हे घटनास्थळी पोहचले तेव्हा वणवा हा स्थानिक लोकांच्या मदतीने विझवण्याचा प्रयत्न चालू होता; परंतु पेटलेला वणवा हा आटोक्यात नसल्याने जाधव यांनी स्थानिकांच्या मदतीने व ब्लोअर मशिनच्या सहाय्याने पेटलेला वणवा विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु पेटलेला वणवा आटोक्यात आला नाही.
होळकरवाडी येथील गायरान क्षेत्रात सन २०२० च्या पावसाळ्यामध्ये २७,७७५ विविध प्रजातीच्या झाडांच्या रोपांची लागवड केली होती. त्यापैकी अंदाजे एकूण १५ ते १६ हजार विविध प्रजातीच्या झाडांची रोपे व इतर वाळलेले गवत जळाले असून, सामाजिक वनीकरण विभागाचे अंदाजे १५ ते १६ हजार विविध प्रजातीच्या झाडांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्तात्रय बागवे व पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील दैनंदिनीमध्ये अकस्मात जळीताची नोंद करण्यात आली आहे.
वणवा लागण्याची कारणे…
उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या आगीत अनेक वनौषधी, सरपटणारे प्राणी, कीटक, तृणभक्षी प्राणी, त्यांची अंडी, घरटी जळून खाक होत असून, अंडी व घरटी जळाल्याने अनेक पक्षी त्या आगीत प्राणांची आहुती देतात. हे वणवे पावसाळ्यात गवत चांगले यावे, म्हणून लावले जातात. काही जण सहज जाताजाता विडी, सिगारेट पेटवून टाकतात. त्यामुळे आगी लागतात. काही जण केवळ हौस म्हणून आग लावतात, तर काही जण शेतातील पालापाचोळा जाळण्यासाठी आग लावतात. तीच आग आटोक्यात न आल्यास इतर ठिकाणी आगी लागतात. वनातील अथवा वनालगतच्या शेतातील झाडांवर असणारे मधमाशांचे पोळे काढण्यासाठीही आग लावली जाते.