पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात भरधाव पोर्शे कार चालवत तरुण- तरुणीच्या अपघाती मृत्यूप्रकरणात पुणे पोलिसांनी लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयात गुरुवारी (दि. १५) पुरवणी दोषारोपपत्र सादर केले आहे. महत्त्वपूर्ण व ठोस पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींविरोधात २४२ पानांचा अहवाल न्यायालयात दाखल केला आहे. त्यामध्ये, प्रत्यक्षदर्शीसह १७ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.
आदित्य अविनाश सूद (वय ५२, रा. बंगला नं. ४७ बी, सोपान वाग, घोरपडी), आशिष सतीश मित्तल (वय ३७, रा. सी ३०१, बेलवेडर सोसायटी, विमाननगर) असे दोषारोपपत्र दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१९ मेच्या पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर – एअरपोर्ट रस्त्यावरील लैंडमार्क सोसायटीजवळ भरधाव ग्रे रंगाच्या आलिशान पोर्शे गाडीने दुचाकीला धडक दिली. त्यात अनिष अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा या आयटी अभियंत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
दरम्यान, पोलिसांनी अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणात अल्पवयीन चालक मुलाच्या आई, वडिलांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत ९०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. त्यानंतर, सूद तसेच मित्तल यांचाही गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने १९ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांना अटक करण्यात आली.
गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांचेविरोधात सबळ पुरावे आढळल्याने गुरुवारी (दि. १५) दोघांविरोधात न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र सादर करण्यात आले. खटल्यांचे काम विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. शिशिर हिरे पाहात आहेत