पुणे : नवीन वीज मीटर जोडणीसाठी २४ हजाराची लाच मागितल्या प्रकरणी महावितरणाच्या तंत्रज्ञावर चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश पाटील (पद – तंत्रज्ञ , महावितरण कार्यालय , सेनापती बापट रोड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ४० वर्षीय इसमाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बांधकाम व्यवसायिक असून त्यांनी करून दिलेल्या वास्तू नुतनीकरण इमारतीमध्ये वीज पुरवठा मीटर कमी पडत होते. त्यामुळे तक्रारदार यांनी त्याठिकाणी नवीन ४ वीज मीटर कनेक्शन घेण्याकरीता व नवीन वीज मीटर जोडणीसाठी अर्ज केला होता. त्यावरून लोकसेवक योगेश पाटील यांनी वरील कामा रिता व स्थळ पाहणी मधे अहवालात त्रूटी न ठेवण्यासाठी प्रत्येकी एका मीटरच्या नवीन जोडणीसाठी ६ हजार रुपये प्रमाणे एकूण ४ मिटरसाठी २४ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
मिळालेल्या तक्रारीची पडताळणी केली असता, लोकसेवक योगेश पाटील यांनी तक्रारदार यांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे योगेश पाटील यांच्या विरुद्ध चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण तपास करत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.