राजगुरूनगर : खेड तालुक्यातील मौजे निमगाव येथील श्री खंडोबा मंदिर देवस्थान परिसराचा रोपवे व अन्य पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे विकास करण्यात येणार असून तेथील आध्यात्मिक, तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्यासाठी परिसरातील सुमारे १०० कोटी रुपये किमतीची २४ एकर शासकीय गायरान जमीन जिल्हा परिषदेकडे वर्ग केली आहे.
राज्यातील आणि राज्याबाहेर भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या निमगाव खंडोबा देवस्थानच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. निमगाव – खंडोबा हे गाव पुणे जिल्ह्यात पुणे-नाशिक मार्गावरील खेड तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या राजगुरूनगरपासून ६ कि मी अंतरावर आहे.
निमगाव खंडोबा देवस्थान प्राचीन, ऐतिहासिक महत्वाचे आध्यात्मिक स्थान आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मौजे निमगाव येथील २४ एकर शासकीय गायरान जमीन निमगाव खंडोबा मंदिर देवस्थान परिसराच्या विकासासाठी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जाहीर झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे खंडोबा देवस्थान परिसराच्या विकासाला लवकरच गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.