लोणी काळभोर: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्यातील तब्बल 232 शाळांचा निकाल शून्य टक्के लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये पूर्व हवेलीतील 15 शाळांचा समावेश आहे. यावरून पुणे जिल्ह्यातील शाळांची गुणवत्ता खालावल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न उभा राहिला आहे. तर शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांनी दोन दिवसात खुलासा करावा. योग्य खुलासा नसल्यास मुख्याध्यापक व वर्गशिक्षक यांची वेतन वाढ रोखण्यात येईल, असा कडक इशारा पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिला आहे.
पुणे जिल्ह्यात पाचवी व आठवीची सन 2023-24 ची शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 100 टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसविणे अपेक्षित आहे. परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा फी, तसेच शाळा संलग्नता फी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या निधीतून भरली जाते. तरी देखील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविले जात नाही, असे निदर्शनास आलेले आहे. तसेच जिल्ह्यातील मोजकेच काही तालुके विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करुन घेत आहेत, असे निकालावरुन निदर्शनास येत आहे.
दरम्यान ,जिल्ह्यातील काही शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म भरलेले नाहीत व काही शाळांचा निकाल शून्य टक्के लागलेला आहे. अशा शाळेतील संबंधित शिक्षक व मुख्याध्यापक यांची एक वेतनवाढ का बंद करण्यात येवू नये? याबाबत संबंधितानी खुलासा दिवसांत समक्ष सादर करावा, तसे न केल्यास किंवा खुलासा समाधानकारक नसल्यास अशा शिक्षकांची एक वेतनवाढ थांबवण्यात येईल, असा इशारा शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी एका परिपत्रकाद्वारे दिला आहे.
पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील 18 शाळेचा निकाल शून्य टक्के लागला आहे. त्यामध्ये हवेली तालुक्यातील 4, भोर 3, खेड 3, मुळशी 4, वेल्हे 2, मावळ 1, जुन्नर 1 अशा एकूण 18 शाळांचा समावेश आहे. हवेली तालुक्यातील चार शाळांमध्ये लोणी काळभोर येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेचा समावेश आहे. तर आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील 214 शाळांचा निकाल 0 टक्के लागला आहेत. यामध्ये हवेली तालुक्यातील 40 शाळा, जुन्नर 38, दौंड 30, खेड 26, आंबेगाव 15, मुळशी 15, शिरूर 11, मावळ 10, भोर 10, इंदापूर 7, तर बारामती, पुरंदर व वेल्हे या तालुक्यातील प्रत्येकी 4 अशा एकूण 214 शाळेचा समावेश आहे.
शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये हवेली तालुक्यात सर्वाधिक जास्त 40 शाळेचा समावेश आहे. तर पूर्व हवेलीतील 14 शाळांचा समावेश आहे. यामध्ये लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायवाडी, हिंगणगाव, खामगाव टेक, मांजरी खुर्द, नायगाव, पेठ, श्री प्रयागधाम, सोरतापवाडी, तारमळा, उरुळी कांचन नंबर 3 उर्दू शाळा, टिळेकर वस्ती, वळती, मांजरी फार्म व गोपाळपट्टी या 14 शाळांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात
जिल्ह्यातील 124 शाळांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेचे फॉर्म न भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर यामध्ये पूर्व हवेलीतील माळवाडी, नायगाव, हिंगणगाव व खामगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. तर जिल्ह्यात 232 शाळांचा शून्य टक्के निकाल लागला आहे. त्यामुळे एकंदरीतच जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता ढासळल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात राहणार, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.