लोणी काळभोर, (पुणे) : ऑनलाईन गुतंवणूक केल्यास ३०० टक्के नफा मिळवून देऊ. असे आमिष दाखवून एका नोकादाराची सायबर चोरट्यांनी २३ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उरुळी देवाची (ता. हवेली) परिसरात घडली आहे. याप्रकरणी एका ३९ वर्षीय व्यक्तीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात सायबर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ऑफिसमध्ये काम करीत असताना, एका अनोळखी मोबाईल नंबर वरून मेसेज आला. तसेच त्यामध्ये ऑनलाईन ट्रेडिंगसाठी रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी ती लिंक ओपन करून व्हर्रच्युअल खाते तयार केले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांना एका व्हॉटसअप ग्रुपमध्ये अॅड केले.
सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांना ट्रेडिंग मार्केट मध्ये २० लाख रुपये गुंतविल्यास ३०० टक्के प्रतिमहिना परतावा मिळेल. अशी खोटी बतावणी केली. तेव्हा फिर्यादी यांनी आपल्याकडे फक्त एकच लाख रुपये असल्याचे सांगितले. तेव्हा सायबर चोरट्यांनी त्यांना तेवढेच पैसे गुंतविण्यास सांगितले आणि फिर्यादी यांनी ३० एप्रिल ला १ लाख रुपये गुंतविले. फिर्यादी यांनी १ मे ला ऑनलाईन बँकेत पैसे पहिले असता, त्यांना १७८५ रुपयांचा नफा दिसून आला.
दरम्यान, सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून ३० एप्रिल ते १० मे या कालावधीत २३ लाख रुपये वेगवेगळ्या खात्यावर वर्ग करून घेतले. मात्र फिर्यादी यांना कोणत्याही स्वरूपाचा परतावा दिला नाही. त्यामुळे फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे करीत आहेत.