संगीता कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने या शैक्षणिक वर्षापासून ११८ शाळांमधील ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी प्रथमच कंत्राटी पद्धतीने २३ समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त समुपदेशक वैयक्तिक, संपुर्ण वर्ग आणि शाळा (शिक्षक, पालक आणि समुदायासह) या तीन स्तरांवर काम करणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सामाजिक, भावनिक, शारीरिक आणि विकासात्मक गरजा समजून घेणे, तसेच त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन वाढविणे, हे समुपदेशकांचे उद्दिष्ट असणार आहे. शालेय कर्मचारी, पालक आणि समुदाय यांच्यामध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी तसेच मुलांचे सर्वांगीण कल्याणाचे हित जपण्यासाठी समुपदेशकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
समुपदेशनासाठी पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया
-अर्जदारांचे त्यांच्या विषयातील ज्ञानाचे मूल्यांकन करण्यासाठी लेखी अभियोग्यता चाचणी तसेच मुलाखत घेण्यात आली.
-आवश्यक शैक्षणिक पात्रतेमध्ये मानसशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर किंवा समाजकार्यातील पदव्युत्तर शिक्षण तसेच विद्यार्थ्यांसमवेत काम करण्याचा किमान एक वर्षाचा अनुभव अशी अट उमेदवारांसाठी होती.
महापालिकेचा हा अभिनव उपक्रम सार्वजनिक शिक्षणासाठी एक नवीन मानक प्रस्थापित करत आहे. विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि भावनिक विकासावर भर देण्यासाठी महापालिका शाळांमध्ये प्रथमच समुपदेशन उपक्रम राबविण्यात येत आहे. महापालिकेचा हा अभिनव उपक्रम सार्वजनिक शिक्षणासाठी नवीन मानक प्रस्थापित करत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये मानसिक आरोग्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर लक्ष केंद्रित करत आहे. यामध्ये शालेय कर्मचारी आणि पालक यांचा सहभागही महत्वाचा आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिकातज्ञांद्वारे समुपदेशकांना प्रशिक्षण देण्यात आले. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी नियुक्त समुपदेशक सज्ज झाले आहेत. निवड करण्यात आलेले समुपदेशक पात्र असल्याची खात्री करण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये उमेदवारांच्या ज्ञानाचे परिक्षण करण्यात आले. तसेच तज्ञांद्वारे या समुपदेशकांना आठवडाभराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका