पुणे : आई कामावर गेली असता १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात आरोपीला विशेष न्यायाधीश श्रीमती एस.बी.राठोड यांनी २२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. हा प्रकार २०१९ ते २५ फेब्रुवारी २०२० दरम्यान सदाशिव कॉलनी नं १, पदमजी पेपरमिल जवळ थेरगांव येथे घडला. अमोल लक्ष्मण वाघमारे (वय-३०, रा. थेरगाव) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत १४ वर्षीय पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिला या पती आणि त्यांची दोन मुले यांच्यासह थेरगाव येथे राहत आहेत. फिर्यादी या धुणी भांड्याची कामे करतात. तसेच पती एका हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉयचे काम करतात. फिर्यादी महिला या धुणीभांडीचे काम करून घरी परत आल्या. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या महिलेने तुम्ही पहाटे कामाला गेल्यानंतर तुमच्या घराशेजारी राहणारा व्यक्ती अमोल वाघमारे हा तुमच्या घरी नेहमी येत असतो.
त्यानंतर फिर्यादी महिलेने याबाबत मुलीला विचारले असता मुलीने सांगितले की, तु कामाला गेल्यानंतर आरोपी अमोल घरी येवून “मी तुझ्यावर खुप प्रेम करतो” असं म्हणाला. त्यावेळी माझे मम्मी पप्पा घरी नाही, तुम्ही घरातुन बाहेर जावा, असे मी त्याला म्हणाले असता आरोपीने माझे तोंड दाबून माझ्या सोबत जबरदस्ती शारिरिक संबंध प्रस्थापित केले. एवढंच नाही तर तु जर कोणाला काहीही सांगितले तर तुला, तुझ्या आईवडिलांना व भावाला मारुन टाकण्याची धमकी दिली.
घाबरलेल्या मुलीने कोणाला काहीही सांगितले नाही. त्यानंतर आरोपीने मुलीसोबत वारंवार जबरदस्ती बलात्कार केला. हा प्रकार २०१९ ते १५ फेब्रुवारी २०२० घडला. या त्रासाला कंटाळून मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला. आईने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी अमोल याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
या खटल्यात पीडित मुलगी आणि फिर्यादी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आला. न्यायाधीश श्रीमती एस. बी. राठोड यांनी आरोपी अमोलला बालकांचे संरक्षण कायदा 2012 च्या सहा नुसार 22 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड, भादवि कलम 452 अन्वये 3 वर्षे सश्रम कारावयास व 2 हजार रुपये दंड, भादवि कलम 506 अन्वये 1 वर्षे कारावास व 2 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी वकील सुप्रिया मोरे आणि देसाई यांनी काम पाहिले.