पुणे : मुळा-मुठा नदीच्या हरित पट्ट्यातील 22 हजार 150 झाडे बाधित होणार आहेत. मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेंतर्गत मंजुरी मिळविण्यासाठी महापालिकेने राज्य पर्यावरण मूल्यांकन प्रभाव परिणाम प्राधिकरणाला अहवाल सादर केला. त्यात हा धक्कादायक उल्लेख करण्यात आला आहे.
मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेंतर्गत 5 हजार कोटींची कामे करण्यात येणार आहेत. 44 किलोमीटर लांबीच्या नदीपात्रामध्ये एकूण 8 टप्प्यांत ही कामे केली जाणार आहेत. यातील 3 टप्प्यांची कामे सध्या सुरू असली तरी या महत्त्वाकांक्षी योजनेला पुण्यातील पर्यावरणप्रेमी आणि संस्था, संघटनांनी आक्षेप घेतले आहेत. या आक्षेपांसंदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) याचिकाही दाखल करण्यात आली.
मुळा-मुठाच्या पात्रातील या योजनेचा डीपीआर तयार करताना नदीपात्रातील झाडे तोडण्यात येणार नसल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र पहिल्या टप्प्यात 5 हजारांपेक्षा झाडे तोडण्यात येणार असल्याचे समोर आले. त्याला महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीनेही मान्यता दिली. बाधित झाडांऐवजी दुपटीने झाडे लावण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरणनंतर महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र आता हरितपट्ट्यातील एकूण 22 हजार 150 झाडे बाधित होणार असल्याचे सांगितले जात आहे.
या योजनेला राज्य मूल्यांकन प्रभाव परिणाम प्राधिकरणाने ही मंजुरी नाकारताना 8 मुद्द्यांवर महापालिकेकडे स्पष्टीकरण मागितले आहे. यासंदर्भात उत्तर देण्याची आणि नियोजन करण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या कामाला कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही. 3 टप्प्यांतील कामे सुरूच राहतील आणि प्राधिकरणाने मागितलेल्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्यात येईल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला आहे.