पुणे : निवडणूक आयोगाने दिलेल्या सी व्हीजील अॅपवरून आचारसंहिता भंगाच्या तक्रारींची संख्या वाढू लागली आहे. आतापर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात आचाररसंहिता भंगाच्या २१९ एवढ्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ६४ तक्रारी ही या वडगावशेरी विधानसभात मतदारसंघातून आल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली. खेड आळंदी, पुरंदर विधानसभा मतदारसंघातून एकही तक्रार प्राप्त झाली नाही. कोथरूड, पिंपरी आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी एक तक्रार प्राप्त झाली आहे. आचारसंहितेचा भंग होण्याचे प्रकार निवडणुकीच्या काळात वाढत असतात.
त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पथकाकडून आचारसंहितेचा भंग होतो की, नाही यावर नजर ठेवली जाते. त्यानुसार गुन्हेही दाखल केले जात आहेत. त्याशिवाय सी व्हीजील अॅपवरही तक्रारींचा ओघ वाढला आहे. सी व्हीजील अॅपवर गेल्या काही दिवसांमध्ये या तक्रारी वाढल्या आहेत. त्यानुसार, आतापर्यंत २१९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये वडगावशेरी मतदारसंघातून सर्वाधिक ६४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर पर्वती ३७, कसबा २५, पुणे कँटोन्मेंटमधून १८, बारामतीमधून १६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.