दीपक खिलारे
इंदापूर : लाकडी-निंबोडी जलसिंचन उपसा योजनेच्या २१८.७९ कोटींच्या निविदेस जलसंपदा विभागाने मंगळवारी (ता. ९) मंजुरी दिली. त्याबद्दल जलसंपदा मंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले. या योजनेच्या कामास आता लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (ता. ११) दिली.
लाकडी-निंबोडी उपसा जलसिंचन योजनेसाठी एकूण ३४८ कोटी रुपयांच्या कामांना जलसंपदा विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. शिवसेना-भाजप सरकारने योजनेच्या विविध कामांची २१८.७९ कोटी रकमेची निविदा प्रक्रिया डिसेंबर २०२२ पासून सुरु केली होती. आता ही निविदा अंतिम टप्प्यात आल्याने येत्या काही दिवसांत लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी १९९५ ते १९९९ मध्ये शिवसेना-भाजप युती शासनामध्ये मंत्री असताना कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या सूचनेनुसार लाकडी-निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल केला. त्यानुसार महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने १३ जुलै १९९८ रोजी ‘इंदापूर सिंचन योजना’ या नावाने योजनेचा आराखडा तयार केला. हर्षवर्धन पाटील यांनी याजनेचा सतत पाठपुरावा केल्याने २००४ मध्ये योजनेस तत्वतः मंजूरी मिळाली, तर २००७ मध्ये प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. या योजनेसाठी हर्षवर्धन पाटील यांनी मंत्रिमंडळात असताना वेळोवेळी बैठका घेतल्या, पाठपुरावा सुरू ठेवला.
अखेर २०१२ मध्ये या योजनेसाठी उजनी धरण पाणी वापर आराखड्यामध्ये ०.८६ टी.एम.सी. पाणी आरक्षित ठेवण्यात हर्षवर्धन पाटील यांना यश आले. या योजनेत इंदापूर व बारामती तालुक्यातील एकूण ७२५० हेक्टर क्षेत्र समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये इंदापूर तालुक्यातील सुमारे ४३३७ हेक्टर तर बारामती तालुक्यातील सुमारे २९१३ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यातील लामजेवाडी, शेटफळगढे, शिंदेवाडी, म्हसोबाचीवाडी, काझड, लाकडी, निंबोडी, निरगुडे, पिंपळे, अकोले या १० गावांचा तर बारामती तालुक्यातील जैनवाडी, पारवडी, रुई, सावळ, वंजारवाडी, कण्हेरी, जळोची या ७ गावांचा समावेश आहे.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी लाकडी निंबोडी योजनेची निविदा काढून प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी जलसंपदा मंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने भेट घेऊन पाठपुरावा केला. आता मंजुर निविदा रक्कम २१८.७९ कोटींच्या निधीमधून पंपगृह टप्पा १ व २, वितरण कुंड १ व २, बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे बांधकाम आदी विविध कामे केली जाणार आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी या वेळी आभार व्यक्त केले. गेली २६ वर्षे या योजनेसाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत आहे, आता लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होत असल्याने आनंद होत असल्याचे या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.