लोणी काळभोर : केंद्र सरकारच्या नीती आयोगातर्फे आयोजित केलेल्या स्टेम स्पार्क इनोव्हेशन फिस्ट २०२३-२४ या बाल वैज्ञानिक स्पर्धेत लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलने बेस्ट डिझाइन या विभागात राष्ट्रीय पातळीवर प्रथम पुरस्कार पटकावला आहे. विद्यालयाने या स्पर्धेत इलेक्ट्रिक स्कुटर हा प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पाचा राज्यात प्रथम क्रमांक आला होता.
राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा बेंगलोर इंटरनॅशनल सेंटर, बेंगलोर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विविध राज्यातील ६० प्रकल्प सादर झाले होते. इलेक्ट्रिक स्कुटर हा प्रकल्प विद्यालयातील राज प्रशांत काळभोर व दिपक रंगराव येवते या विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षक आर एम साठे यांच्या मदतीने तयार केला आहे.
इलेक्ट्रिक स्कुटर या प्रकल्पाची अटल इनोव्हेशनचे संचालक चिंतन वैष्णव, भारताच्या प्रथम मिसाईल महिला डॉ टेसी थॉमस, बेंगलोरचे आयुक्त जी रमेश यांनी प्रशंसा केली. या प्रकल्पासाठी विद्यालयाचे प्राचार्य एस एम गवळी, पर्यवेक्षिका आर डी पाटील यांचे सहकार्य लाभले. एमआयटी विद्यापीठाच्या नेहा झोपे व गावडे यांचे या प्रकल्पासाठी मार्गदर्शन लाभले. हा प्रकल्प तयार करण्यासाठी पालक शैलेश काळभोर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. या कामगिरीनंतर शिक्षक व विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.