पुणे: परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत नव्वद टक्के हजेरीची अट शासनाने घातली आहे. एखाद्या विद्यार्थ्याकडून वरील अट पुर्ण न झाल्यास त्याला परीक्षेला बसू दिले जात नाही. मात्र, शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील महिन्याला पन्नास हजार ते एक लाखापर्यंतचा गलेलठ्ठ पगार घेणारे दोनशेहून अधिक शिक्षक गेल्या पाच ते दहा वर्षांपासून अध्यापनासाठी त्यांची नेमणूक असलेल्या वर्गावर गेलेच नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
विशेष बाब म्हणजे हवेली, जुन्नर, आंबेगाव आणि शिरुरसह विविध तालुक्यातील जिल्हा परीषदेच्या सेवेत असलेले दोनशेहून अधिक शिक्षक गेल्या पाच ते दहा वर्षांपासून अध्यापनासाठी वर्गात गेले नसले, तरी शिक्षकांचे अधिकारी म्हणून मिरवणाऱ्या केंद्रप्रमुखांची कामे मात्र चोखपणे करीत आहेत. दहापेक्षा अधिक शिक्षक, तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयातील शिक्षण विभागात डेटा एंट्रीचे काम चोखपणे करीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील दोनशेहून अधिक शिक्षक विद्यादानाचे आपले मुख्य काम सोडुन केंद्र प्रमुखांची चाकरी करत असल्याची बाब शाळेतील उपशिक्षक, तालुक्याच्या गटशिक्षण अधिकाऱ्यापासून ते थेट जिल्हा परीषदेच्या अधिकाऱ्यांनाही माहित आहे. मात्र, काळाची गरज म्हणून संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी वरील प्रकार सुरु राहू दिला असल्याची चर्चा शिक्षण खात्यामध्ये आहे. वरील शिक्षक त्यांचे नेमून दिलेले मुख्य काम करत नसल्याने, मागील दहा वर्षांच्या काळात हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर सुटले असल्याचे विदारक चित्र आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागले आहे.
हवेली, जुन्नर, आंबेगाव, शिरुरसह जिल्हातील तेरा तालुक्यात जिल्हा परिषदेने शिक्षणाच्या सुसुत्रीकरणासाठी दोनशे पेक्षा अधिक केंद्रप्रमुखांची नेमणुक केली आहे. हवेली, जुन्नर व शिरुर या तीन बड्या तालुक्यात प्रत्येकी वीसहून अधिक केंद्रप्रुमख आहेत. तर उर्वरीत दहा तालुक्यात दहा ते वीसच्या दरम्यान केंद्रप्रमुखांची संख्या आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणारे शिक्षक, मुख्याध्यापक व गटशिक्षण अधिकारी यांच्यामधील दुवा म्हणून केंद्रप्रमुख काम करतात. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या प्राथमिक शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी करणे, शिक्षक शाळेत वेळेवर येतात का? ते वर्ग घेतात का? शाळांचा दर्जा याची तपासणी करण्यापासून, शाळांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परीषदेने केंद्रप्रमुखांची नेमणुक केलेली आहे. परंतु, याच दोनशेहून अधिक केंद्रप्रमुखांनी “आपल्या ” सोईसाठी, आपल्या केंद्रातील संगणकाचे ज्ञान असलेल्या एक-दोन शिक्षकांना हाताखाली नेमले आहे. त्यांच्याकडून विविध कामे करुन घेतली जात आहेत. असे जिल्ह्यात दोनशेहून अधिक शिक्षक आहेत.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील एका निवृत्त अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हवेली व जुन्नर तालुक्यात सर्वाधिक वीस केंद्रे असून, तालुक्यात वीस केंद्रप्रमुख काम करत आहेत. केंद्रप्रमुखांनी आपल्यावरील कामाचा बोजा कमी करण्यासाठी पंचवीसपेक्षा अधिक शिक्षक कामाला लावले आहेत. हे शिक्षक शिक्षकांची माहिती भरणे, शाळा व शिक्षकांकडून केंद्रप्रमुखाना लागणारी माहिती गोळा करणे, शिक्षकांना संगणकीय मदत करणे अशी कामे करत आहेत. या कामामुळे वरील शिक्षक त्यांच्या वर्गावर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
केंद्रप्रमुखांनी आपल्या हाताखाली आपआपली माणसं नेमल्याने केंद्रप्रमुख “साहेब” बनले आहेत. तर दुसरीकडे संबंधित शिक्षकांच्या वर्गातील विद्यार्थी मात्र शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे विदारक चित्र आहे. वरील धक्कादायक प्रकार गेल्या दहा वर्षांपासून सुरु आहे. महिन्याला पन्नास हजार ते एक लाख रुपये एवढा गलेलठ्ठ पगार घेणारे शिक्षक आपल्या मुख्य कामापासून दूर पळणे व विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणे, ही बाब अतिशय गंभीर असून, वरील प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.
चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार: जनार्दन दांडगे
याबाबत बोलताना भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा (उत्तर) सोशल मिडीयाचे अध्यक्ष जनार्दन दांडगे म्हणाले, शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील दोनशेहून अधिक शिक्षक विध्यार्थांना शिक्षण देणे, या आपल्या मुख्य कामापासून दूर पळणे व गेल्या दहा वर्षांच्या काळात जिल्ह्यातील लाखो विद्यार्थी हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहणे, ही बाब अतिशय गंभीर आहे. वरील प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असून वरील प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार आहे. सदर घटना गंभीर असून, या प्रकरणी जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही जनार्दन दांडगे यांनी स्पष्ट केले.