पिंपरी : हिंजवडी फेज वनमधील अॅकॉर्ड अॅटॉकॅम्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील गॅसभट्टीचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत २० कामगार जखमी झाले. जखमींपैकी चार कामगारांची प्रकृती गंभीर असून आठ कामगारांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले. ही घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.
याप्रकरणी कंपनीचे मालक, प्रशासन तसेच, इतर देखभालीचे काम पाहणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सैफन इस्माईल शेख (वय २५, रा. चिंचवड), राजनंद सुरेश कौशल्य (वय २७, रा. राक्षेवाडी, माण), लखन सुशील बिझारी (वय ३८, रा. मारूंजी), नागेशकुमार (वय २४) अशी गंभीर जखमी झालेल्या चार कामगारांची नाव आहेत. सागर लक्ष्मण सोलसे (वय ३५, रा. शेळकेवाडी, घोटावडे) या कामगाराने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास १९ कामगार हे वाहनांचे सुट्टे भाग चारचाकी वाहनाच्या गॅस भट्टीच्या ओव्हन मशिनमध्ये कोटींग करीत होते. त्यावेळी गॅस भट्टी गरम होवून त्यामध्ये अचानक स्फोट झाला. गॅसभट्टीमधील पावडर कोटींगसाठी ठेवलेले सुट्टे भाग आणि आगीमुळे १९ कामगार जखमी झाले. त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रावेत येथे उपचार घेत असलेल्या चार कामगारांची प्रकृती गंभीर असून २० ते २५ टक्के भाजले आहेत. तर, हिंजवडीमध्ये सात कामगारांवर उपचार सुरू असून त्यांच्या हात, पाठीला भाजले आहे. अन्य आठ कामगारांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले आहे.
कामाच्या ठिकाणी स्फोटक गॅस भट्टीची नियमित देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याप्रकरणी कंपनीच्या मालकासह प्रशासन व इतर देखभालीचे काम पाहणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सोन्याबापू देशमुख आधिक तपास करीत आहेत.