शेवाळेवाडी: झाडं पृथ्वीवरील वातावरण शुद्ध करण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात. याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन वृक्ष संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. तर दुसरीकडे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शेवाळेवाडी (ता. हवेली) बस डेपोसमोरील २० झाडांची कत्तल केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता.१२) सकाळच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी कदंभ फाउंडेशनने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
कदंभ फाउंडेशन गेल्या ७ वर्षांपासून एक सामाजिक उपक्रम म्हणून राष्ट्रीय महामार्गाच्या परवानगीने रस्ता दुभाजकामध्ये झाडे लावत असून, त्याची निगाही राखत आहे. रस्त्याच्या दुभाजकामध्ये लावलेल्या झाडांमुळे रात्रीचे अपघाताचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. मात्र, गुरुवारी (ता.११) मध्यरात्री अज्ञात लोकांनी शेवाळेवाडी बसडेपो समोरील १२ झाडे तोडून टाकलेली आहेत. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कदंभ फाउंडेशनने निवेदनाद्वारे हडपसर पोलिसांकडे केली.
दरम्यान, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडीपाट ते हडपसर या दरम्यानची हजारो झाडे जागविण्याचे काम मागील कदंभ फाउंडेशन विनामूल्य करत आहे. मात्र, या रस्त्याची डागडुजी करताना ठेकेदाराचे कामगार चक्क झाडांच्या बुंद्याशी डांबर टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यामुळे झाडांचे आयुष्य धोक्यात आले असतानाच आता झाडांची कत्तल होणे ही एक दुर्दैवी बाब आहे.
पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल करून कारवाई करावी
यावेळी बोलताना कदंभ फाउंडेशनचे नितीन कोलते म्हणाले की, ‘झाडे लावून ती जागविण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहेत. मात्र, शेवाळवाडी येथील रस्त्याच्या दुभाजाकावरील झाडे ह फ्लेक्स व्यावसायिकांनी तोडल्याचा संशय आहे. कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूने फ्लेक्स दिसावा म्हणून त्यांनी ही कुरापत केलेली असावी. पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी’.