लोणी काळभोर : घरका भेदी लंका ढाए! या म्हणीप्रमाणे हडपसर येथे एका सेवानिवृत्त न्यायधीशाची देखभाल करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या एका केअर टेकरनेच घरातील हिरा, सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा सुमारे २० लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेमुळे कामगारांवर विश्वास ठेवायचा की नको? असा सवाल उपस्थित झाला आहे.
सुनिल सुदाम जगताप (वय ४८, रा. घर नं. ८५, जयश्री निवास, मुकुंदवाडी, ता. जि. संभाजीनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुलाब फतेसिंगराव भोसले (वय ८०, मगरपट्टा, हडपसर, पुणे) या जेष्ठ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाब भोसले यांचे पती फतेसिंगराव भोसले हे एक सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत. मागील काही वर्षांपासून ते आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांची देखभाल करण्यासाठी आरोपी सुनिल जगताप याला केअर टेकर म्हणून जुलै २०२४ पासून ठेवण्यात आले होते. फिर्यादी या त्याच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी जुलै महिन्यात गेल्या होत्या. लग्नसमारंभ आटोपून आल्यानंतर फिर्यादी यांनी त्यांचे सर्व दागिने एका पिशविमध्ये घालून घरातील कपाटात ठेवले होते.
फिर्यादी गुलाब भोसले या सोमवारी कमांड हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी जाणार असल्याने त्या हॉस्पीटलचे कार्ड शोधत होत्या. परंतू त्यांना हॉस्पीटलचे कार्ड मिळून आले नाही. त्यावेळी त्यांनी घरातील कपाटामध्ये सोन्याचांदीची पिशवी पाहिली असता, पिशवी आढळून आली नाही. घरामधील पिशवीमध्ये एक हिरा, २४ तोळे सोन्याचे दागिने, १० हजार रुपयांचे चांदीचे दागिने व रोख 50 हजार रुपये असा चालू बाजारभावाप्रमाणे सुमारे २० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे लक्षात आले.
दरम्यान, घरामध्ये फिर्यादी, त्यांचे पती व सुनिल जगताप हे तिघेजणच राहत होते. त्यामुळे ही चोरी सुनिल जगताप यानेच केली असल्याचा संशय फिर्यादी यांना आला. त्यानंतर फिर्यादी यांनी तत्काळ हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी सुनिल जगताप याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे मधाळे करीत आहेत.