पुणे : ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली पुण्यात दोघांची २० लाखांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी एकाने भारती विद्यापीठ आणि दुसऱ्याने कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कात्रज परिसरात राहणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाने याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरज शेंडे असे फिर्यादीचे नाव आहे. हा प्रकार २८ नोव्हेंबर २०२३ ते १९ जानेवारी २०२४ दरम्यान घडला. ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे चांगले पैसे कमावता येतील, असा मेसेज तक्रारदार तरुणाच्या व्हॉट्सॲपवर अनोळखी मोबाइल क्रमांकावरून आला. टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात मोबदला मिळेल, असे सांगून संबंधित कामाचे आणि पैसे कमावल्याचे स्क्रिनशॉट सुरज शेंडे याला पाठवण्यात आले.
त्यानंतर सुरजला आणखी आकर्षित करण्यासाठी टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. त्यानंतर त्याला वेगवेगळे टास्क दिले. सुरूवातीला टास्क पूर्ण केल्याचा चांगला मोबदला दिला आणि तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगत पैशांची गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल, असे आश्वासन देण्यात आले. त्याला तब्बल १५ लाख २३ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे भरूनही परतावा न मिळाल्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सुरजने माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेमध्ये कोंढवा परिसरात राहणाऱ्या इम्रान शेख अब्दुल रौफ (३२) यांनी फिर्याद दिली आहे. ‘वर्क फ्रॉम होम’चे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यात ४ लाख ६४ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.