मंचर : आंबेगाव तालुक्यातील आदर्शगाव गावडेवाडी येथील शेरी हासवड वस्तीच्या नजीक अंदाजे २० ते २५ एकरपेक्षा जास्त क्षेत्रावरील ऊस शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि. १९) दुपारच्या सुमारास घडली आहे. ऊस पीक जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
नेमकं काय घडलं?
शेतातून गेलेल्या महावितरणच्या विद्युत वाहक तारांचे घर्षण होऊन उसाच्या शेताला आग लागली. या आगीत तब्बल २० ते २५ एकर ऊस जळून गेला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच महावितरण कंपनीचे कर्मचारी तसेच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आगीचे लोळ जास्त असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अपयश आले.
या दुर्घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकरी निवृत्ती धोंडिबा टेमकर व भीमसेन खंडू जारकड यांचा तब्बल ११ एकर, तर मच्छिंद्र शंकर जारकड यांचा साडेपाच एकर ऊस जळाला आहे. तसेच इतर काही शेतकऱ्यांचेही ऊसपिकाचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.