पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याच्या मोटारीतून आणखी दोन किलो ४०० ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. त्याला मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थासह अटक केल्यानंतर आज सकाळीच पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. पिंपळेनिलख रक्षक चौकात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या नमामी झा या हॉटेल कामगाराला पोलिसांनी २ कोटी रूपये किमतीचे मेफेड्रोन अमली पदार्थासह अटक केली होती.
याप्रकरणी नमामी झा याची चौकशी केली असता त्याने निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक शेळके याचे नाव घेतले होते. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षकाची चौकशी केली असता त्याचा सहभाग स्पष्ट झाला. त्याला ४४ किलो ७९० ग्रॅम किलो वजनाच्या ४४ कोटी ७९ लाख ८० हजार रुपयांचे मेफेड्रोनसह अटक करण्यात आली होती.
दरम्यान, शेळकेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून सकाळीच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अटकेदरम्यान उपनिरीक्षक शेळके याची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. चौकशी दरम्यान त्याच्या मोटारीत आणखी मेफेड्रोन असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन किलो ४०० ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन शेळके याच्या गाडीतून जप्त केले. त्यामुळे पुन्हा एकदा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.