पुणे: गाव नमुना 12 मध्ये पिक पाहणीच्या पारंपारीक पध्दतीमध्ये बदल करण्यात आला आहे. आपल्या शेतातील पिकांची नोंद ई- पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी करावी. यासाठी महाराष्ट्र शासनाचा ई-पीक पाहणी हा महत्वकांशी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला ३ वर्ष पूर्ण होत आहेत. तर ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये आत्तापर्यंत 2 कोटी 12 लाख 76 हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी (रजिस्ट्रेशन) केली आहे, अशी माहिती पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयाने दिली आहे.
केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे खरीप हंगाम 2023 पासून डिजिटल पीक सर्वेक्षणचा पायलट प्रकल्प राबविण्याचे निश्चित केलेले आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्याची निवड करण्यात आलेली आहे. राज्याच्या सध्या वापरत असलेल्या ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये केंद्र शासनाने सांगितलेल्या अत्यावश्यक बाबींचा समावेश करण्यात येणार आहे. राज्याचे ई-पीक पाहणी (डिजिटल क्रॉप सर्वे) मोबाईल ॲप सानुकूलित (customized) करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे 4 ऑगस्ट 2023 पासून डिजिटल क्रॉप सर्वे पायलट प्रकल्प राबविण्यात येत आहे.
राज्यातील खरीप हंगाम सन 2023 मध्ये डिजिटल क्रॉप सर्वे पायलट प्रकल्प राबावण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावे व नाशिक जिल्ह्यातील देवळा या पूर्ण तालुका असे एकूण 114 गावात राबविण्यात आलेला होता. रब्बी हंगाम 2023-24 साठी राज्यामध्ये क्रॉप सर्वे पायलट प्रकल्प राबावण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील तीन गावे व नाशिक जिल्ह्यातील देवळा हा पूर्ण तालुका असे एकूण 148 गावांची निवड करण्यात आलेली होती.
15 एप्रिल 2024 पासून उन्हाळी हंगामात राज्यामध्ये डिजिटल क्रॉप सर्वेचा पायलट प्रकल्प राबावण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील एक तालुका असे एकूण 34 तालुक्यांमधील 3032 गावांची निवड करण्यात आलेली आहे. उन्हाळी हंगाम 2024 मध्ये या 34 तालुक्यांमध्ये डिजिटल क्रॉप सर्वेच्या प्रक्रियेनुसार पिक पाहणी नोंदविली जाईल व राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये पूर्वीच्या प्रक्रियेनुसार पिक पाहणी नोंदविली जाईल. या दोन्ही प्रक्रियेसाठी साठी एकच मोबईल ॲपचा वापर करण्यात येणार आहे.
दरम्यान, प्रत्येक खातेदाराने आपला पीक पेरा या ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदविणे गरजेचे आहे. कारण ई-पीक पाहणीच्या नोंदी या पीक विमा, पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटप, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे, इत्यादी बाबींसाठी आवश्यक असणार आहेत.
उन्हाळी हंगाम २०२४ साठी सुधारित ई-पीक पाहणी व्हर्जन – 3.0.0.0 हे सुधारित मोबईल ॲप गुगल प्लेस्टोअर वर 15 एप्रिल 2024 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी हे सुधारित मोबाईल ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून उन्हाळी हंगामातील पीक पाहणी विहित वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
सचिंद्र प्रताप सिंग (जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख, पुणे)