पुणे : मारहाणीचा राग मनात धरुन, टोळक्याने सिद्धार्थ हादगे या तरुणाचा पाठलाग करून, पुण्यातील गणेश पेठ परिसरात, इमारतीच्या टेरेसवर कोयत्याने सपासप हल्ला करत निर्घृण खून केला होता. ओसवाल बिल्डिंगच्या छतावर रविवारी मध्यरात्री बॉलीवूड चित्रपटाप्रमाणे हा थरार घडला.
या प्रकरणातील २ आरोपींना बारा तासांत अटक करण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी तुषार राजू कुंदुर, आशुतोष राजू कुंदुर, प्रथमेश कांबळे, हर्षल गोरखनाथ पवार यांच्यासह इतर पाच ते सहा जणांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी अक्षय प्रदीप आमराळे (वय २९, रा. पांगुळआळी, गणेश पेठ) याने फिर्याद दिल्यानुसार आरोपींना अटक करण्यात आले आहे. पोलीस खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींच्या शोधात होते. त्यावेळी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अंमलदार अजय थोरात व अनिकेत बाबर यांना माहिती मिळाली की, तुषार कुंदुर व त्याच्या साथीदारांनी गणेश पेठेतील सिद्धार्थ हादगे याचा खून केला असून, आरोपी व त्याचा साथीदार आशुतोष वर्तले हे दोघे कोथरुडजवळ पौड फाटा येथे थांबले असून, ते पळून जाण्याच्या तयारीत आहेत.
पोलिसांच्या पथकाला माहिती मिळताच तत्काळ पोलीस अॅक्शन मोडवर आले. पथकाने पौड फाटा परिसरात जाऊन आरोपींचा शोध घेतला. त्यावेळी आरोपी पौड फाटा पुलाच्या खाली उभे असल्याचे आढळले. या वेळी पोलिसांनी मोठ्या शिताफीने तुषार राजु कुंदुर (वय २१, रा. मेनकर वाडा, गणेश पेठ), आशुतोष संतोष वर्तले (वय २०, रा. बुरुड आळी, गणेश पेठ) यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, दोन्ही आरोपींच्या चौकशीमध्ये काही बाबी उघड झाल्या आहेत. दोघांना युनिट एकच्या कार्यालयात आणून चौकशी केली असता, आरोपी तुषार याने सांगितले की, सिद्धार्थ हादगे याच्याशी त्याचे २०२१ मध्ये भांडण झाले होते. त्यावेळी हादगे याने त्याच्यासह व भाऊ आशिष कुंदुर याच्यावर वार केले होते.
याबाबत खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर हादगे याने तुषारसह त्याच्या भावाला शिवीगाळ करणे, वस्तीत येऊन दहशत माजवणे, वारंवार त्रास देणे, असा प्रकार सुरू ठेवला. दरम्यान, २४ ऑक्टोबर रोजी एल.टी.जी. मंडळामध्ये कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी फ्लेक्स लावला होता. त्यावेळी सिद्धार्थ हादगे याने त्याठिकाणी येऊन गोंधळ करुन कार्यक्रमाचा फ्लेक्स फाडला. यावरुन पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले.
अखेर रविवारी (ता. १९) हर्षल पवार हा शेर-ए-पंजाब बार येथून जात असताना हादगे व त्याचा सोबतचा अक्षय अमराळे याने त्याला बोलावून घेतले. हादगे याने त्याला शिवीगाळ करुन मारहाण केली. हादगेच्या तावडीतून सुटून हर्षल घरी आला. त्याने मारहाण केल्याचे सांगितले.
त्यानंतर हर्षल पवार, आशुतोष वर्तले, प्रथमेश कांबळे, प्रतिक करपेकर, समर्थ वर्दैकर, भाऊ आशिष कुंदुर असे सर्वजण शिवरामदादा तालीम समोरील इमारतीत गेलो. त्याठिकाणी हादगे याच्यावर वार केले तसेच आशितोष वर्तले याने आणलेल्या दगडाने ठेचून त्याचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. दरम्यान, पुढील कार्यवाहीसाठी आरोपींना फरासखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.