शिक्रापूर : पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील दोन रस्त्यांच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या स्थानिक युवकांच्या मागणीला पीएमआरडीएने प्रतिसाद देत तब्बल १९५ कोटींच्या रस्ता कामांना मंजुरी दिली. या रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादनाचाही समावेश सदर तरतुदीमध्ये असल्याची माहिती उपोषणकर्त्यांनी दिली.
पिंपळे जगताप (ता. शिरूर) करंदी फाटा ते भारत गॅस कंपनी व एल अँड टी फाटा ते करंदी या दोन्ही रस्त्यांच्या मागणीसाठी पिंपळे जगताप येथील युवकांनी ऑगस्टमध्ये तब्बल पाच दिवसांचे साखळी उपोषण केले होते. दरम्यान, पंचायत समितीचे शाखा अभियंता अनिल गावडे व उपअभियंता डी. बी. राठोड यांनी आंदोलकांची भेट घेत रस्त्याच्या कामासाठीचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेकडे पाठविले होते. या रस्त्यावर सुरू असलेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक स्थानिक सरपंच व पदाधिकाऱ्यांनी घेतली होती.
या प्रकरणी उपोषणकर्ते तथा आंदोलक श्रीपाद जगताप, अरुण जगताप, शामराव बेंडभर, सुभाष जगताप, संदीप जगताप, अशोक नाईकनवरे, चंदन सोंडेकर आदींनी पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर करंदी फाटा ते भारत गॅस कंपनी व एल अँड टी फाटा ते करंदी या दोन्ही रस्त्याच्या कामासाठी तब्बल १९५.८ कोटींची तरतूद केल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.