बारामती : आज जर महाराष्ट्रात निवडणुका लागल्या तर महाविकास आघाडीचे १९० ते २०० आमदार आणि ३४ ते ३६ खासदार निवडून येतील असा सर्वे राजदीप सरदेसाई यांनी केल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शहरातील आमराई परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथील घरकुलाची पाहणी केली. यावेळी सुळे बोलत होत्या. याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, स्थानिक नगरसेवक बिरजू मांढरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की, पुण्यासारख्या महानगरात सुरक्षिततेचा प्रश्न उग्र रूप धारण करत आहे. कोयता आणि गॅंग हे दोन शब्द माहिती आहेत. मात्र, कोयता गॅंग हा शब्द माहिती नाही. अनेक महिलांनी आमच्या मुली शाळा कॉलेजला जातात, त्यांची काळजी वाटते असे सांगत आहेत. त्यातच राज्य शासनाचा अहवालात महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कामाला फारसे यश मिळत असल्याचे दिसत नाही, असे सुळे यांनी बोलताना सांगितले.
अनेक जण असे आरोप करतात की सर्व निधी बारामतीला नेला जातो. यावर बोलताना सुळे म्हणाल्या की, बारामतीला तर निधी दिलाच आहे तो बारामतीकरांचा अधिकार आहे. मात्र इतर तालुक्यांना उपाशी ठेवून बारामतीला निधी दिला हे मला मान्य नाही. सासवड जेजुरीचे उदाहरण देत सुळे म्हणाल्या की जेजुरी मंदिर आणि परिसर विकसित करण्यासाठी साडेचारशे कोटींचा निधी दिला आहे.
सासवड शहराला अडीचशे कोटी दिला आहे. सर्वत्र सर्वांगीण विकास कसा होईल याकडे अजित पवार यांनी सातत्य ठेवल्याचे खासदार सुळे यांनी स्पष्ट केले.