पुणे : दहशतवादी विचारधारेचा प्रसार तसेच तरुणांची माथी भडकवून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढणाऱ्या ‘आयसिस’च्या महाराष्ट्र गटाकडून पुणे, मुंबईसह देशभरात बाँम्बस्फोट करण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती मिळाली होती. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी सॅल्सबरी पार्क परिसरात छापा टाकला. या वेळी ‘एनआयए’च्या पथकाने १९ वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून संशयास्पद वाटणारी कागदपत्रे तसेच मोबाइल जप्त करण्यात आला आहे.
पुण्यात १९ वर्षीय तरूणाची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सॅलिसबरी पार्कमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याची एनआयएकडून सोमवारी चौकशी करण्यात आली आहे. त्याचे मोबाईल आणि इलेक्ट्रॅानिक डिव्हाइस जप्त करण्यात आले आहे. बंगळुरुमधील इसिस मॅाड्यूलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये तो सहभागी झाला. संबधित तरुणाची कसून चौकशी एनआयएचे पथक करत आहे. विद्यार्थ्यांच्या चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
ठाणे, पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ९ डिसेंबर रोजी छापे टाकले होते. या वेळी ‘एनआयए’च्या पथकाने ठाणे शहरातील पडघा आणि राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये कारवाई करून दहा संशयितांना ताब्यात घेतले होते. तरुणांचे डोके भडकवून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढणाऱ्या ‘आयसिस’च्या महाराष्ट्र गटाकडून पुणे, मुंबईसह देशभरात बाँम्बस्फोट करण्याचा कट रचण्यात आला होता.
या प्रकरणात यापूर्वी मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ आदिल उर्फ आदिल सलीम खान (दोघे रा. रतलाम, मध्यप्रदेश), कादीर दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादीर (रा. कोंढवा), समीब नासीरउद्दीन काझी (रा. कोंढवा), जुल्फीकार अली बडोदावाला उर्फ लालाभाई उर्फ सईफ, शामिल साकीब नाचन, अकिफ आतिफ नाचन (तिघे रा. पडघा, जि. ठाणे ) यांना अटक करण्यात आली होती.