पुणे : धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये अठरा हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गेले काही दिवस धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा मोठ्याप्रमाणावर वाढला आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणात १.६१ टीएमसी (८१.४३ टक्के) इतका पाणीसाठा झाला होता. तसेच खडकवासला धरणसाखळीत पाच वाजेपर्यंत एकूण २४.९५ टीएमसी म्हणजे ८५.५९ टक्के इतका साठा झाला होता. पानशेत आणि वरसगाव धरण क्षेत्रातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील डोंगरी पट्टयात जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने वाढ होत आहे.
पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे रविवारी पानशेत धरणाच्या सांडव्यावरून ४७१२ क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. पानशेत धरण पाणलोट क्षेत्रात काही प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. पानशेत धरण शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर असून, या धरणात ९५.४३ टक्के जलसाठा झाला आहे.
वरसगाव धरणात १०.२९ टीएमसी म्हणजेच ८०.२५ टक्के इतका जलसाठा झाला आहे. टेमघर २.८९ टीएमसी म्हणजे ७७.९९ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व धरणात येणारे पाणी वाढत गेल्यास कधी ही धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी धरण परिसरात कोणीही उतरू नये आणि नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावेत, त्याचबरोबर नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.