लोणी काळभोर : घर का भेदी लंका ढाए! या म्हणीप्रमाणे थेऊर (ता. हवेली) येथील भैरवनाथ हायटेक अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काम करणाऱ्या सुपरवायझरनेच तब्बल 1800 अंड्यांची चोरी केल्याची घटना मंगळवारी (ता.6) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आणि चोरीची अंडी ही थेऊर फाटा जवळील एका विक्रेत्याला विकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
संदिप वासुदेव कुमार (वय 24, सध्या रा. गाढवेमळा थेऊर, ता. हवेली, मूळ रा. गुरुवक्षगंज, समबरेली राज्य उत्तरप्रदेश) व राजु राम गायकवाड (वय 27, सध्या रा. थेऊर फाटा, ता. हवेली, मूळ रा. चवडापुर-गाणगापुर, राज्य-कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रसाद कृष्णाजी भगत (वय-56, रा. सेनापती बापट रोड, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद भगत हे एक व्यावसायिक असून त्यांची थेऊर (ता. हवेली) येथे भैरवनाथ हायटेक अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड ही अंडी बनविण्याची कंपनी आहे. या कंपनीत हॅपी एग्ज तयार होत असून या अंड्यांना बाजारात चांगला भाव आहे. तर भैरवनाथ हायटेक अॅग्रोमध्ये आरोपी संदिप कुमार हा काही महिन्यांपासून सुपरवायझर म्हणून काम करीत आहे.
मंगळवारी (ता.6) रात्री सव्वा अकरा वाजता आरोपी संदिप कुमार याने कंपनीतून अंड्यांचे सुमारे 10 बॉक्सची चोरी केली. या अंड्यांच्या प्रत्येक बॉक्समध्ये 6 अंड्यांचे 30 छोटे बॉक्स, याप्रकारे प्रत्येक बॉक्समध्ये 180 अंडी, म्हणजे दहा बॉक्समधून सुमारे 1800 अंड्यांची चोरी झाली. या चोरीत फिर्यादी प्रसाद भगत यांची 15 हजार 200 रुपयांची अंडी चोरी झाली. याप्रकरणी प्रसाद भगत यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी संदिप कुमार व विक्रेता राजु गायकवाड याला दोन तासाच्या आत मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या. व चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेश करे करीत आहेत.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस हवालदार महेश करे व पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे यांनी केली आहे.