पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळातील कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून हंगामी सेवक म्हणून काम करीत होते. त्यातील १७४८ सेवकांना कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सातव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम व त्यांच्या इतरही काही महत्त्वाच्या मागण्यांबाबत सर्किट हाउस येथे चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले.
परिवहन महामंडळाच्या सीएमडी दीपा मुधोळ मुंडे, पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले व पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, हडपसर मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे, कामगार प्रतिनिधी नुरुद्दीन इनामदार, राजेंद्र कोंडे, हरीश ओहळ, राहुल कुटे उपस्थित होते.
हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे हे सदर विषयाचा वारंवार पाठपुरावा करत होते. बैठकीमध्ये कामगारांचा प्रलंबित सातव्या वेतन आयोगाचा फरक (चार-४) समान हप्त्यात देण्याचे धोरण ठरले आहे. पहिला हप्ता चालू महिन्यातच तातडीने देण्याचे आदेश अजित पवार यांनी आज दोन्ही आयुक्तांना दिले. त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून बदली, रोजंदारी, हंगामी सेवक म्हणून काम करणारे कामगार कायम होण्याची मागणी करत होते. त्यावर तोडगा काढत या विषयात उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ज्या सेवकांची २४० दिवस हजेरी भरलेली आहे, अशा १७४८ बदली सेवकांना तातडीने कायम करण्याचे आदेश या प्रसंगी दिले.