शिक्रापूर (पुणे): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील मलठण फाटा परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. रोहित राजाभाऊ थोरात (वय १७, रा. शिक्रापूर मलठण फाटा, ता. शिरूर, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. राजश्री राजाभाऊ थोरात (वय ३५, रा. शिक्रापूर, मलठण फाटा) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
रोहित थोरात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास क्लासवरून आल्यानंतर घराच्या आतमधील खोलीत झोपलेल्या आईला बाहेरच्या खोलीत झोपायला सांगून स्वतः आतील खोलीत झोपला. त्यानंतर सहा वाजण्याच्या सुमारास रोहितला त्याच्या आई-वडिलांनी आवाज दिला असता त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे वडिलांनी पाठीमागील खिडकीतून आतमध्ये पाहिले असता रोहित याने गळफास घेतल्याचे दिसून आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राकेश मळेकर हे करत आहेत.