शिरुर : शिरूरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिरुर शहरातील बाबूरावनगर येथे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रतन बुधे ढोली (वय-17 वर्ष रा. बाबुरावनगर. शिरूर) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गणेश बुधे ढोली (वय- 30 रा. पाचर्णे मळा, शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नेमके प्रकरण काय ?
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश ढोली हा मृत रतनचा भाऊ आहे. गणेश हा पाचर्णे मळा येथील त्यांच्या घरी होता. त्यावेळी त्यांला त्यांचा छोटा भाऊ लक्ष्मण याने फोन करून सांगितले की, रतन बुधे ढोली याने आपल्या राहत्या घरी पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे.
त्यानंतर गणेश आणि लक्ष्मण हे दोघेजण बाबूराव नगर येथे आले. मात्र, त्यावेळी त्यांचा भाऊ रतन राहत असलेल्या पत्रा शेड समोरील परिसरात त्यांचे नातवाईक जमा झालेले दिसले. रतन ढोली हा खाली झोपलेला अवस्थेत दिसला, तेव्हा त्यांना समजले की, त्यांचा भाऊ रतन बुधे ढोली याने राहत्या घराच्या पत्र्याच्या शेडच्या अँगलला साडीच्या सहाय्याने आत्महत्या केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी धाव घेत घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेचा पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक टेंगले पुढील तपास करीत आहेत.