पिंपरी: अतिवृष्टीमुळे पिंपरी चिंचवड शहरातील विविध ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने सुमारे ४ हजार ५०० नागरिकांना तात्पुरत्या स्वरुपात निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आवश्यक ती तपासणी देखील करण्यात येत आहे. त्यांच्यावर योग्य उपचार करण्यासाठी सर्व निवारा केंद्रांवर महापालिकेच्या वतीने 16 वैद्यकीय पथके २४ तास कार्यान्वित ठेवण्यात आली असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकिय विभागामार्फत १६ पथके तयार केलेली असून यापथकांमार्फत या नागरिकांची आरोग्य तपासणी करुन औषधोपचार करण्यात येत आहेत. पूरपरिस्थिती व ठिकठिकाणी पाणी साचलेले असल्यामुळे एम.पी.डब्ल्यु, आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत पुरबाधित परिसरामध्ये जलजन्य व किटकजन्य आजारांबाबत घरोघरी जाऊन सर्वेक्षण, जनजागृती व आजारी नागरिकांना औषधोपचार पुरविण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे. तसेच जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आठवड्यातील एक दिवस एक तास आपल्या घराच्या आतील व बाहेरील पूर्ण परिसराचे परिक्षण करावे. पाणी साचणारी सर्व ठिकाणे (डासोत्पत्ती स्थाने) नष्ट करावी, असे आवाहन देखील वैद्यकिय विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
दरम्यान, महापालिकेच्या वतीने पूरबाधित नागरिकांना निवारा केंद्रांवर स्थलांतरित केले असून त्या ठिकाणी भोजनासह आवश्यक गोष्टी पुरविण्यात येत आहेत. तसेच त्यांच्यासाठी आवश्यक वैद्यकीय पथक देखील कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सम्राट चौक, लालटोपी नगर, भाटनगर, पिंपरी रिव्हर रोड, रामनगर, पत्राशेड लिंकरोड, बौद्धनगर आदी ठिकाणचे नागरिक तर ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील चिंचवड येथील तानाजी नगर, काळेवाडी येथील पवनानगर, रावेत येथील समीर लॉन्स, शिंदे वस्ती रस्ता, जाधव घाट आदी परिसरातील नागरिकांचा समावेश आहे. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत लक्ष्मीनगर, पवार वस्ती, भुमकर वस्ती, चोंदे घाट, शिक्षक सोसायटी, लक्ष्मी कॉलनी, ओम शिव कॉलनी, दत्तमंदिर रोड, पिंपळेगुरव, भुजबळ वस्ती, वाकड परिसर तर ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत रामनगर, बोपखेल येथे २० ते २५ घरांमध्ये तीन ते चार फुट पाणी शिरले होते. त्या ठिकाणच्या नागरिकांना निवारा केंद्रात हलविले आहे. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत घरकुल, श्रीराम कॉलनी, तळवडे, डिफेंस कॉलनी, पाटीलनगर, चिखली आदी परिसरात बचावकार्य करण्यात आले असून ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत संजय गांधी नगर, आंबेडकर नगर, सुभाष नगर, वाल्मिकी आश्रम, पवना नगर, जगताप नगर, संजय गांधी नगर या ठिकाणी बचावकार्य करण्यात आले आहे.
‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत हिराबाई झोपडपट्टी, कासारवाडी, भारत नगर, फुगेवाडी, दापोडी परिसर मुळानगर, मधुबन सोसायटी, जुनी सांगवी आदी ठिकाणी बचावकार्य करण्यात आले करण्यात आले असून शहरातील विविध ठिकाणी साठलेले पाणी निवळल्यानंतर आज महापालिका पथकाच्या वतीने शहरातील विविध भागात तुंबलेल्या चेंबर्सची स्वच्छता करणे, रस्त्यावरील गाळ काढणे, नदीकाठी जमा झालेल्या कचरा तसेच गाळ जेसीबीच्या सहाय्याने हटविणे, माती साचलेल्या ठिकाणी पाणी फवारणी करून स्वच्छता करणे, विविध ठिकाणी निर्जंतुकीकरण करणे तसेच निवारा केंद्रांमध्ये भोजन आणि आदी व्यवस्था करणे अशी विविध कामे करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मनपा बोपखेल शाळा, मोशी येथील काही परिसर, घरकुल, पिंपळेगुरव, जुनी सांगवी आदी ठिकाणांचा समावेश आहे.
सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून परिस्थिती हळूहळू पुर्वपदावर येत आहे. तरीही, नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन देखील आयुक्त सिंह यांनी केले आहे.