पुणे : पुण्यातील महादेव गोविंद रानडे ट्रस्टच्या मालकीची 16 एकर जमीन बळकावून फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २००७ ते २०२३ या सोळा वर्षाच्या कालावधीमध्ये सर्व्हट्स ऑफ इंडिया सोसायटी संस्थेत घडला आहे. याप्रकरणी सर्वंट्स सोसायटी ऑफ इंडियाचे सचिव मिलिंद भगवंत देशमुख यांच्यासह तिघांवर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ट्रस्टचे सदस्य सुनील वामन भिडे (वय-६६, रा. हामोंनी, डेक्कन दुर्दशा सव्हन्ट्स सोसायटी जिमखाना) यांनी बुधवारी (दि. १७) डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मिलिंद भगवंत देशमुख (रा. एफसी रोड, डेक्कन), यांच्यासह त्यांचा मेहुणा सागर बाळासाहेब काळे (रा. धनकवडी, पुणे) आणि शिवाजी विठ्ठलराव धनकवडे (रा. धनकवडी, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
याबाबत अधिक माहिती अशी कि, महादेव गोविंद रानडे ट्रस्टची हवेली तालुक्यातील शेवाळवाडी येथे 16 एकर जमीन आहे. ही जमीन ट्रस्ट सर्व्हंट्स सोसायटी ऑफ इंडियाशी संलग्न आहे. आरोपी सर्व्हंटस् सोसायटी ऑफ इंडिया चे सचिव मिलिंद देशमुख यांनी आर्थिक फायद्याच्या उद्देशाने जमिनीची बनावट कागदपत्र तयार करून सातबारा उताऱ्यावर सही करून ट्रस्टची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली.
दरम्यान, ट्रस्टची जमीन बळकावून फसवणूक केली. हा प्रकार ट्रस्टचे सदस्य सुनील भिडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी डेक्कन पोलिसांत तक्रार दिली. या अर्जाची चौकशी करून पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिदे करत आहेत.