लोणी काळभोर : पोलीस असल्याची बतावणी करून गैर कृत्यबाबत भीती व दपटशहा दाखवून भामट्याने लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका नोकरदाराची 15 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी एका 29 वर्षीय पुरुषाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अज्ञात सायबर चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सदर प्रकार हा (दि. 02 ते 05 सप्टेंबर 2024) या दरम्यान लोणी काळभोर मध्ये घडला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एक खाजगी नोकरदार असून लोणी काळभोर परिसरात कुटुंबासोबत राहतात. एके दिवशी फिर्यादी हे घरी असताना, त्यांना व्हॉट्स अॅप व्हिडिओ कॉल आला. फिर्यादी यांनी फोन उचलला. त्यानंतर त्यांना सायबर चोरट्याने पोलीस असल्याची बतावणी केली. व फिर्यादी यांना गैर कृत्याबाबत भीती व दपटशहा दाखवून त्यांच्या बँकेच्या खात्यातून 15 लाख 50 हजार रुपयांची रक्कम काढून घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
त्यानुसार भामट्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 319(2), 318(4) 3(5) 204, 61(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 डी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा हा पुढील तपासासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट करीत आहेत.