शिरूर, (पुणे) : दफनभूमीसाठी जागेचा प्रश्न प्रलंबित असल्याने, मुस्लिम व गोसावी समाजाला वारंवार अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या समाजाला हक्काची जागा मिळावी, यासाठी पंचायत समिती सदस्य सुभाष पोकळे, सरपंच संगीता पोकळे व स्थानिक ग्रामस्थांनी पाठपुरावा केल्यामुळे हक्काची जागा मिळणे शक्य झाले. कवठे येमाई (ता. शिरूर) येथे दफनभूमीसाठी हक्काची सरकारी जागा उपलब्ध करून दिल्याने मुस्लिम व गोसावी समाजाचा दफनभुमीसाठीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे.
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे दफनभूमीसाठी हक्काची जागा नव्हती. त्यामुळे मागील काळात सरकारी मदत घेऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ या समाजावर आली होती. त्यातून दफनभुमीसाठी हक्काची जागा मिळावी, अशी मागणी येथील मुस्लिम समाजाने केली होती. या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून अखेर १५ गुंठे सरकारी गायरानातील जागा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजबांधवांनी समाधान व्यक्त केले.
गोसावी समाजासाठी देखील १५ गुंठे जागा ही दफनभुमीसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे या समाजाचा दफनभुमीचा प्रश्न मार्गी लागला आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या कब्रस्थानाला दहा लाख रूपये निधी संरक्षण भिंतीसाठी देण्यात आला होता. त्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य सुभाष पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी सरपंच संगिता पोकळे, उपसरपंच उत्तम जाधव, रामदास सांडभोर, सुभाष उघडे, अविनाश पोकळे, विक्रम इचके, सचिन बोऱ्हाडे, माजी प्राचार्य आर. मोमीन, पुणे प्राईम न्युजचे उपसंपादक युनूस तांबोळी, अब्दुल तांबोळी, रफिक आत्तार, चांद पठाण, दिपक गोसावी, शिवचरण गोसावी, शंकर गोसावी, प्रकाश गोसावी, सुभाष गोसावी, शरीफ मोमीन, शरीफ तांबोळी, आसिफ तांबोळी आदी उपस्थित होते.
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून ४५ मीटर संरक्षण भिंतीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. यानंतर संरक्षण भिंतीचे काम होण्यासाठी अजूनही निधीची उपलब्धता आवश्यक आहे. त्यापाठोपाठ येथील सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. ईदगाह मैदान, पार्किंग, पाण्याची टाकी, जनाजा नमाज पठणासाठी जागा, ही कामे करणे गरजेचे आहे. यासाठी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सुन्नी मुस्लिम समाजाने केली आहे.
संरक्षण भिंतीसाठी निधी देणार
मुस्लिम व गोसावी समाजासाठी दफनभूमी हा अत्यंत गांभीर्याचा विषय होता. अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या या समस्येसाठी गायरान क्षेत्रातील जागा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. त्यानुसार ही जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापुढे या क्षेत्रात संरक्षण भिंतीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.
– सुभाष पोकळे, माजी पंचायत समिती सदस्य, शिरूर