पुणे : मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या दोन पैकी एका आरोपीला लग्नाकरिता १५ दिवसांचा तात्पुरता जामीन देण्यात आला आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
आकाश सोनावणे व मानव अडागळे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपीचे वकील ॲड. नितीन भालेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील मानव अडागळे याचा जमीन मंजूर करण्यात आला आहे. आरोपी दोघांवर मार्केट यार्ड पोलिसांनी अल्पवयीन मुलींची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ०२ जानेवारी २०२४) रोजी फिर्यादी यांची मुलगी व मैत्रीण शाळेत जात असताना, प्रेम नगर चौकात आकाश सोनावणे व मानव अडागळे यांनी त्यांना थांबवून त्यांची छेड काढली होती. ही माहिती मुलींनी तिच्या मामांना फोनवरून दिली होती. मुलींचा मामा व भाऊ यांनी छेड काढणाऱ्या आरोपींना जाग्यावरच पकडले. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावर पोलीसांनी आरोपींना अटक केली.
आरोपीला अटक करून विशेष न्यायालयात हजर केले गेले. त्यावर त्यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली होती. आरोपींना न्यायालयीन कस्टडीमध्ये घेण्याचे आदेश पारित झाले होते. त्यानंतर मानव अडागळेकडून जामीनांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. आरोपी तर्फे अॅड नितीन भालेराव व अॅड. पल्लवी राऊत यांच्या तर्फे युक्तिवाद करण्यात आला.
सदर आरोपी मानव अडागळे याने कुठलाही गुन्हा केला नाही. आरोपी व फिर्यादी हे शेजारी राहतात. मानव अडागळे याचे ५ जानेवारीला लग्न आहे. त्याचे लग्न होऊ नये, या सूड भावनेने हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सदर युक्तिवादात सांगण्यात आले. आरोपी तर्फे लग्नाची पत्रिका व इतर कागदपत्रे न्यायालयात दाखल करण्यात आली.
दरम्यान, आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून जिल्हा व सत्र न्यायधीश बी .पी. क्षीरसागर यांच्या कोर्टाने मानव अडागळेला लग्नाकरिता १५ दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर करण्याचे आदेश पारित केले आहेत, अशी माहिती आरोपींचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली. यामध्ये अॅड. मयूर चौधरी, अॅड आलाप कुलकर्णी, अॅड दीपक खेडकर यांनी मदत केली.