पुणे : भारत सरकारने १८८४ मध्ये एका योजनेअंतर्गत पोस्टल लाइफ इन्शुरन्स योजना सुरू केली होती. या योजनेला यावर्षी १४० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त पुणे ग्रामीण डाक विभागातर्फे १ फेब्रुवारी २०२४ रोजी १४० साव्या वर्धापन दिनानिमित विशेष मोहीम राबविली जाणार आहे. त्यादिवशी विभागातील सर्व डाक घरांतून प्रत्येक घर, शासकीय/निमशासकीय/खासगी कार्यालये/संस्थांना प्रत्यक्ष भेटी देवून, व्यक्तिगत संपर्क साधून, टपाल जीवन विम्याचे महत्त्व सांगितले जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांना टपाल जीवन विम्याच्या कक्षेत आणण्यात येणार आहे.
सुरुवातील डाक विभागातील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित असणाऱ्या डाक विम्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा, या उद्देशाने भारत सरकारने या योजनेमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार आता या योजनेत केंद्र सरकारचे कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी, देशसेवा करणारे सैनिक, निमलष्करी दल, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये काम करणारे कर्मचारी, सरकारी शैक्षणिक संस्थांचे शिक्षक आणि कर्मचारी, नगरपालिका, जिल्हा परिषद, राष्ट्रीयीकृत बँका, मान्यताप्राप्त विद्यापीठांचे कर्मचारी तसेच डॉक्टर, वकील, अभियंते, चार्टर्ड अकौंटंट यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच पदवीधारक व पदविकाधारक यांना सुद्धा आता पोस्ट ऑफिसचा टपाल जीवन विम्याच्या कक्षेत समावेश करण्यात आला आहे.
टपाल जीवन विमा हा आपल्या ‘कमी प्रीमियम, उच्च बोनस’ या विशेषतेसाठी प्रसिद्ध आहे. टपाल जीवन विमा अंतर्गत संतोष, सुरक्षा, सुविधा, सुमंगल, युगल सुरक्षा व बाल जीवन विमा इत्यादी विमा योजना उपलब्ध आहेत. या योजना भारत सरकारतर्फे राबविल्या जात असल्यामुळे विश्वासार्ह असून, सर्वात जुनी विमा योजना आहे.
प्रत्येक गावामध्ये पोस्ट ऑफिसची सुविधा असल्यामुळे नागरिक टपाल जीवन विमा उघडू शकतात आणि हप्ता भरू शकतात. तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन प्रीमियम भरता येऊ शकतो. तसेच पॉलीसीचा क्लेम कुठल्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये घेऊ शकता. सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक बा. पो. एरंडे यांनी केले आहे. 140 years of Postal Life Insurance Scheme Pune Gramin Dak Department special campaign on anniversary