पुणे : पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत गेल्या १५ दिवसांत पोलिसांसह भरारी पथकाने मद्य आणि चांदीचा सुमारे १४ कोटी ५७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आचारसंहिता भंगाच्या तक्रारींची नोंद घेण्यात आली आहे. विशेषतः महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली तेव्हापासून ते आतापर्यंत पुणे शहर जिल्ह्यातील विविध भागांतून केलेल्या कारवाईत रोख रक्कम आणि मुद्देमाल हस्तगत केला आहे.
खेडशिवापूर येथे सापडलेल्या पाच कोटी रुपयांच्या रकमेसह खेड, आळंदी, मावळ, हडपसर, शिरूर, दौंड आणि वडगाव शेरी या ठिकाणी नऊ कोटींहून अधिक रुपयांची रोख रक्कम सापडली. त्याशिवाय दोन लाख ४३ हजार लीटर एक कोटी ८२ लाख रुपये किमतीचे मद्य जप्त करण्यात आले. जिल्ह्यातील २१ मतदारसंघांमधून एक कोटी ८२ लाख रुपये किमतीचे मद्य जप्त करण्यात आले. तर भोसरी, चिंचवड, दौंड, जुन्नर, कसबा पेठ, खेड-आळंदी, कोथरूड, मावळ, पुरंदर, शिवाजीनगर, शिरूर आणि वडगाव शेरी या मतदारसंघांतून सुमारे २३ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ आढळले आहेत. कोथरूडमध्ये सुमारे ३७ किलो वजनाचे आणि १८ लाख १२ हजार रुपये किमतीची चांदी जप्त केली आहे.
तसेच पर्वती मतदारसंघात ४३ हजार ७९२ ग्रॅम वजनाचे आणि सुमारे १३८ कोटी रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने पोलिसांकडून जप्त करण्यात आले. मात्र, त्याची शहानिशा करून ते दागिने संबंधित सराफांना देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याशिवाय अन्य साहित्य भरारी पथकासह पोलिसांकडून जप्त करण्यात आले. असा एकूण १४ कोटी ५७ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता समन्वय कक्षाच्या वतीने देण्यात आली.
आचारसंहिता भंगाच्या ४९८ तक्रारी
पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत आचारसंहिता भंगाच्या एकूण ४९८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून १५८ इतक्या सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या. त्याशिवाय पर्वती, कसबा पेठ, पुरंदर, शिवाजीनगर या मतदारसंघांतून तक्रारी आल्या आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.