पुणे: मुंबई अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या पथकाने पुण्यात विविध ठिकाणे छापे टाकले. या छाप्यात पथकाने १३५ कोटींचे सुमारे २०० किलो ड्रग्ज जप्त करून चार आरोपींना अटक केली आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे एका संशयित वाहनाला मुंबई अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या पथकाने अडविले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे संशयास्पद पावडर आणि काही प्रयोगशाळेची उपकरणे आढळून आली. याचा पाठपुरावा करताना, पथकाला एक गुप्त युनिट मिडगुलवाडी, (जिल्हा, पुणे) येथे सापडले. त्या गुप्त प्रयोगशाळेत 173.34 किलो अल्प्राझोलमचे उत्पादन कच्च्या मालासह सापडले.
पुढील एका कारवाईत नारायणगाव जवळ (ता.आंबेगाव, जि. पुणे) येथे २५.९५ किलो अल्प्राझोलम कच्च्या मालाच्या प्रचंड साठ्यासोबत आणखी एक गुप्त उत्पादन युनिट आढळून आले. या दोन्ही ठिकाणी अमंलीपदार्थाचा (ड्रग्ज) पुरवठा करणाऱ्या एकाच समूहाद्वारे या गुप्त लॅब चालवल्या जात असल्याचे समोर आले.
मंचर येथे ताडीचे दुकान चालवणारा एक व्यक्ती बेकायदेशीररीत्या अल्प्राझोलमची विक्री करताना आढळून आला. त्यानंतर त्याला पथकाने अटक केली आहे. पुणे येथून या सर्व बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या एका महत्वाच्या सूत्रधाराची माहिती मिळाली, त्याला त्याच्या एका साथीदारासह मिरारोड, ठाणे येथून अटक करण्यात आली.
दरम्यान, या कारवाईत १३५ कोटी रकमेचे १९९.२९ किलो अल्प्राझोलम तसेच एक वाहन आणि दोन कारखान्यावर जप्ती करण्यात आली आहे. या कारवाईतून महाराष्ट्रातून कार्यरत असलेल्या आंतरराज्यीय अमली पदार्थाचे रॅकेट उघड झाले आहे. अटक करण्यात आलेल्या चार तस्करांवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.