पुणे : रेल्वे प्रशासनाने गेली आठ महिन्यांच्या कालावधीत पुणे विभागात तब्बल २ लाख ३२ हजार १९३ फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १३ कोटी ३४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वेकडून सातत्याने फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी तिकीट तपासणीस, रेल्वे सुरक्षा बल यांच्या माध्यमातून मोहीम हाती घेण्यात येते.
तसेच, दररोज तिकीट तपासणीदेखील करण्यात येते. यामार्फत १ एप्रिल ते १ डिसेंबर या कालावधीत रेल्वेच्या पुणे विभागाने तब्बल २ लाख ३२ हजार १९३ फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १३ कोटी ३४ लाख रुपयांचा दंड वसूल केल्याचे समोर आले आहे. यामध्ये अनियमित तिकीट प्रवासी, विनातिकीट प्रवासी आणि सामान बुक न करता घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
रेल्वेच्या पुणे विभागात दिवसाला अनियमित तिकीट प्रवासी, विनातिकीट प्रवासी आणि सामान बुक न करता घेऊन जाणारे असे एकूण मिळून सरासरी ८०० ते ९०० च्या घरात फुकटे प्रवासी सापडत आहेत. १ डिसेंबर रोजी फक्त एकाच दिवसात पुणे विभागात ८३२ फुकटे प्रवासी सापडले आहेत. त्यांच्याकडून साडेपाच लाखांपर्यंत दंड एकाच दिवसात वसूल करण्यात आला. याची नोंद रेल्वेच्या पुणे विभागाकडे करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना विभागीय वाणिज्य व्यवस्थापक म्हणाले कि, रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे रेल्वे स्थानकासह एकूण १०२ रेल्वे स्थानके आहेत. या सर्व स्थानकांवर मिळून ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांच्या काळात अनियमित तिकीट प्रवासी, विनातिकीट प्रवासी आणि सामान बुक न करता घेऊन जाणारे तब्बल २ लाख ३२ हजार १९३ प्रवासी सापडले आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १३ कोटी ३४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.