पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी आणि दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासंदर्भात वेगवेगळ्या बातम्यांमुळे विद्यार्थ्यांसह पालक वर्ग गाेंधळून गेला आहे. मात्र, बारावी परीक्षेचा निकाल येत्या २० मे रोजी, तर दहावीचा निकाल या महिन्याच्या चाैथ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. दाेन्ही निकालाची तारीख निश्चित हाेताच मंडळातर्फे अधिकृतरीत्या सांगण्यात येईल अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी दिली आहे.
इयत्ता बारावी आणि दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता असते. दहावी, बारावी निकालानंतर पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठीची तयारीही विद्यार्थ्यांनी सुरू केलेली आहे. दरम्यान, निकाल कधी लागणार ? याबाबत सध्या वेगवेगळ्या बातम्या आणि चर्चांना उधाण आलं आहे. या संदर्भात दाेन्ही परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत. तसेच गुणपत्रिका तयार करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. साधारणपणे मे अखेर निकाल जाहीर करणार असल्याचे यापूर्वीच राज्य मंडळाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले हाेते.
रिपोर्टनुसार, अगोदर बारावीचा आणि त्यानंतर दहावीचा निकाल लागेल. मात्र, या निकालाबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कोणतीही तारीख जाहिर करण्यात आली नाही. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या साईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने निकाल बघता येईल.