पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आत्तापर्यंत १ हजार २६७ गुन्हे नोंदविण्यात आले असून, १ हजार १७९ जणांना अटक करण्यात आली आहे, तर १८२ वाहने जप्त करत ५ कोटी ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात दारू विक्रीत मोठी वाढ होते. अनेकदा परराज्य, जिल्ह्यांतून अवैधरीत्या दारू वाहतूक होण्याची शक्यता असते. या सर्व पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत १ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात १८ तात्पुरते चेकनाके उभारून कारवाई केली जात आहे. सदर व्यक्तींकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात येत असून, आत्तापर्यंत १२ प्रकरणांत ११ लाख ८० हजार रुपये इतक्या रकमेचे बंधपत्रे घेण्यात आलेली आहेत.
दरम्यान, या काळात गोवा राज्यनिर्मित मद्याचे तीन गुन्हे उघडकीस आले असून, या गुन्ह्यांमध्ये ४१ लाख ७७ हजार ३५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे, राज्य उत्पादन शुल्कचे अंमलबजावणी व दक्षता सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक चरणसिंह रजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.