पुणे : पत्नीला मारहाणीच्या गुन्ह्यात बारा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बारडोली (गुजरात) येथून अटक केली आहे. आरोपी गेल्या बारा वर्षांपासून स्वतःचे नाव बदलून गुजरातमध्ये वास्तव्य करत होता. रहिम उर्फ वहिम अब्बास पटेल (वय-४५, रा. बारडोली, जि. सुरत, गुजरात. मूळ रा. हडपसर) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी बहीम पटेल याला न्यायालयाने वॉरंट बजावले होते. त्याचा ठावठिकाणा न लागल्याने न्यायालयाने त्याला फरारी घोषित केले होते. गुन्हे शाखेच्या युनिट-५चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे आणि पथकाने वानवडी परिसरात त्याचा शोध घेतला.
मात्र, तो हाती लागला नाही. त्याचे नातेवाईक, मित्रांकडे चौकशी करण्यात आली. मात्र, पोलिसांना काही माहिती मिळाली नाही. आरोपी पटेल नाव बदलून गुजरातमधील बारडोली परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस हवालदार राजस शेख यांना मिळाली. माहितीच्या आधारे या पथकाने बारडोली परिसरात त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या अटकेला घाबरून स्वतःचे नाव बदलून वास्तव्य करीत असल्याचे त्याने सांगितले. तपासासाठी त्याला वानवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.