योगेश पडवळ
पाबळ : शिरूर तालुक्यातील बारा गावांना “शेतीसाठी धरणाचे पाणी द्या” या प्रश्नासाठी बारा गावांतील ग्रामस्थ एकवटले आहेत. खूप दिवसांपासून शेतीला पाणी हा प्रश्न प्रलंबित आहे. खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप वळसे पाटील, खासदार आढळराव पाटील यांच्यासोबत चर्चा आणि निवेदन देऊन सुद्धा ‘शेतीला पाणी’ या विषयावर तोडगा न निघाल्यामुळे, बारा गावांतील सर्व ग्रामस्थांनी पाबळ चौकात १० नोव्हेंबरला सकाळी अकरा ११ वाजता ‘रास्ता रोको’ करण्याचा पवित्रा घेतला आहे.
बारा गावांतील ग्रामस्थ व समितीमधील समन्वयक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘रास्ता रोको’ आंदोलन झाल्यावर २१ नोव्हेंबरला केंदूर गावठाणामध्ये साखळी उपोषण करून आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारने दखल न घेतल्यास, १ डिसेंबर रोजी कान्हुर मेसाई येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील दिला आहे.
‘शेतीला पाणी’ हे आंदोलन तीव्र स्वरूपात होणार असल्याचे सांगितले जात आहे. या बारा गावांतील पाणी प्रश्नासाठी बारा गावांतील सरपंच देखील सहभागी होणार असून, बारा गावांच्या पाणी प्रश्नासाठी बारा गावांतील बारा सरपंच एकत्र आले आहेत. बारा गावांचा पाणी प्रश्न हा आंदोलनाच्या माध्यमातून मांडणार, असे बारा गावातील ग्रामस्थांनी सांगितले आहे.