पुणे : पुण्यात पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी शनिनगर येथील एका खोलीत जमलेल्या बारा जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५ कोयते, ५ दुचाकी, मिरची पावडर, रस्सी असा २ लाख ५२ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रथमेश ऊर्फ देवीदास कुडले (वय-२३, रा. दत्तनगर), प्रकाश पाराजी काटे (वय-२४, रा. दत्तनगर), करण संदीप चिकणे (वय-२०, रा. सातववाडी, गोंधळेनगर, हडपसर), अजहर रमजान सय्यद (वय-२३, रा. काशेवाडी, भवानी पेठ), सुशांत सुधाकर धोत्रे (वय-१९, रा. संतोषनगर, कात्रज), आयाजन नियाज शेख (वय-१९, रा. न्यू मोदीखाना, कॅम्प), रिहान रमजान सय्यद (वय-२०, रा. काशेवाडी, भवानी पेठ), अरजान शाहीद शेख (वय-१९, रा. न्यू नाना पेठ), फरहान सतिश येनपुरे (वय-१९, रा. सारस सोसायटी, धनकवडी), दुर्गेश् हनुमंत सिद्धापुरे (वय-१८, रा. फुरसुंगी, हडपसर), अंकीत राजू हकाळे (वय-२१, रा. संतोषनगर, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कदम, पोलीस अंमलदार मंगेश पवार, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ,निलेश खैरमोडे, चेतन मोरे, धनाजी धोत्रे, सचिन सरपाले हे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने १५ सप्टेबर रोजी रात्री पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना शनिनगर चौकातील महादेव मंदिराच्या मागील बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये काही जण हत्यारासह एकत्र जमले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याची खात्री केली असता अंधारामध्ये काही जण बसलेले आढळून आले.
दरम्यान, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले. त्यांना पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविल्यावर त्यांनी आम्ही सर्व एकमेकांचे मित्र असून पैशांची गरज असल्यामुळे महामार्गावरील पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीत येथे एकत्र जमल्याची कबुली दिली. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.