पुणे : आषाढी एकादशीनिमित्त पुणे ते मिरजदरम्यान १२ अनारक्षित डेमू १२ जुलै ते २० जुलैदरम्यान चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या रेल्वेगाड्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. पुणे-मिरज-पुणे स्पेशल (ट्रेन क्रमांक ०११४७) अनारक्षित डेमू आषाढी विशेष १७ ते २० जुलैदरम्यान सहा फेऱ्या होणार आहेत. पुणे रेल्वे स्टेशनवरून ही गाडी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून, त्याच दिवशी सायंकाळी सव्वाचार वाजता मिरजला पोहोचणार आहे.
अनारक्षित डेमू (ट्रेन क्रमांक ०११४८) ही आषाढी विशेष १५ ते २० जुलैदरम्यान मिरज येथून चार वाजून ४५ मिनिटांनी सुटणार असून त्याच दिवशी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी पुणे स्थानकावर पोहोचणार आहे. या गाडीला दहा डबे असणार आहेत. या गाड्यांना हडपसर, दौंड, जेऊर, कुर्दुवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, ढालगाव, कवठे महांकाळ, सलगरे आणि आरग आदी स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत.